वाचन प्रेरणा दिन

0 Mr. Annasaheb Babar

 वाचन प्रेरणा दिन 



डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा, या साठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तद्वतच डॉ. कलाम यांच्या किमान एका पुस्तकाचे वाचन शिक्षकांनीही करावे, असेही अभिप्रेत आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम नेहमी करीत असत. वैज्ञानिक असताना त्यांनी १९९६ मध्ये इंडिया २०२०हे पुस्तक लिहिले. याच पुस्तकाच्या आधारे देशाच्या तेव्हाच्या नियोजन आयोगाने व्हिजन २०२० तयार केले. नकारात्मकतेचे कारण नाही, तुन्ही सर्व काही करू शकता. कारण तुमच्याकडे अलौकिक साहस आहे, हे पटवून देण्याचा डॉ. कलाम यांचा नेहमीच प्रयत्न राहिला. त्यासाठी ते कायम मुलांमध्ये रमलेले असत. त्यातूनच त्यांनी इंडोमिटेबल स्पीरिट हे पुस्तक लिहिले. त्यांनी एकूण २४ पुस्तके लिहिली असून, त्यातील बहुतांश पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली आहेत.

कोणताही देश त्या देशातील शाळांच्या वर्गामध्येच घडतो, असा त्यांचा सिद्धांत होता. त्यामुळेच त्यांचा जन्मदिन राज्य सरकारने वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. वाचन छापील पुस्तकाचे असो की, ई-पुस्तकाचे, संकेतस्थळांवरचे असो वा व्हॉट्सअॅप पोस्टचे, वाचनाची सवय लागणे असा उद्देश यामागे आहे. या साठी प्रत्येक शाळेतील इयत्ता तिसरीपासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेत डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा ही संकल्पना याच निर्देशाचा भाग आहे. या कट्टय़ासाठी विविध विषयांवरची पुस्तके समाजसहभागातून गोळा करून शाळेत पुस्तकपेढी निर्माण करणे अभिप्रेत आहे.

मुलांचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाचन प्रेरणा चळवळ होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एक व्यक्ती एक पुस्तक भेट उपक्रमात प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकाने, माजी विद्यार्थ्यांने व पालकाने एका विद्यार्थ्यांला तसेच शाळेला विद्यार्थ्यांंच्या वयाला अनुरूप होतील, अशी पुस्तके भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार या विषयी माहिती देणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेते व वाचन या उदाहरणांवर चर्चासत्रे घडवून आणणे, पुस्तकांचे वाटप करून वाचन दिन व अध्यापन दिन साजरा करणे असे काही उपक्रम सुचविण्यात आले आहेत.

कादंबरी  ऑडिओ स्वरुपात ऐकण्यासाठी खालील ऑडिओ ई पुस्तकं (कानगोष्टी) यावर क्लिक करा.


        ऑडिओ ई पुस्तकं (कानगोष्टी)


*******************************

ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख  या  आत्मचरित्राचे समीक्षण


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close