मराठी भाषा गौरव दिन : - 27 फेब्रुवारी


    मराठी भाषा गौरव दिन : - 27 फेब्रुवारी
 ◆ वि.वा. शिरवाडकर उर्फ  "कुसुमाग्रज" ◆
     यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार...
         पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर  कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.
        दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या.
            १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते. जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
मराठी माझ्या संतांची

ज्ञानोबाची नी तुकोबांची

अम्रुताहूनी गोड वानी

असे माझ्या मराठीची...
शिवबा माझा इथे जन्मला

मराठमोळ्या मातीत

शत्रूंची लख्तरे फाडली

मावळ्यांच्या संगतीत...
बहीनाबाईंची गोड गाणी

मराठीने सजविली

मराठी बाना, मराठी वानी

विदेशातही रूजविली...
माझी मराठी आहे जातीवंत

तीचा इतिहास काय वर्णू

बाविस शतके झाली तरीही

आजचीच वाटतेय जनु...
अभिजात दर्जा देवून आता

सम्रूद्ध करूया मराठीला

मराठी बोल अन् विचार मराठी

साथ हवी या सत्कर्माला...
शब्दांशब्दांत मराठीच्या

वात्सल्य,प्रेम अन आईची माया

सम्रूद्ध व्हावी शतकानूशतके

माझ्या गोड मराठीची काया...

             ✍ ~ संगिता रविंद्र तट्टे

✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿

               
■ मराठी भाषा दिवस ■
( जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन;मराठी भाषा गौरव दिन)

      मनोहरपंत जोशी हे मुख्यमंत्री असताना मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांच्या २७ फेब्रुवारीला येणाऱ्या जयंतीदिनी साजरा करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे कुसुमाग्रजांच्या कार्याचा सन्मान झाला.कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेबाबतच्या योगदानाबाबत सरकारी स्तरावर पाळल्या जाणारा हा एक दिवस. कुसुमाग्रजांचे मराठी भाषेच्या क्षेत्रातील योगदान निश्चीतच मोठे आहे,
   हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीलापाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.
    "इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी", अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता, करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे, शब्दब्रह्मही म्हंटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो..!!
           म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.
           मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व , ज्ञानपिठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन "मराठी राजभाषा दिवस" साजरा केला जातो. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचं मोठं केले, या बहुआयामी जगात स्वताः ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली आज तिच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीचा महंमंगल दिवस आहे. या निमित्ताने आज आपण मराठी भाषा दिनाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊया. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नसेल तर आपला मित्र परिवार, कुटूंबिय यांच्यासमवेत मराठीचा जागर करू शकता. अगदी घरातील सदस्य कुणी कथाकथन, कविता वाचन, परिच्छेद वाचन, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी अशा माध्यमातून हे करता येऊ शकते. आपणच आपल्या मुलाबाळाना हा मराठीचा समृद्ध वारसा दाखवायला हवा. आणि या निमित्ताने मराठी वापराचा व अभ्यासाचा वसा आपण घेऊन मराठीला समृद्ध करुया. आपणास मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
                    ■ माझी मराठी मातृभाषा ■
      मराठी भाषा आमुची मायबोली – म्हणजे मातृभाषा. लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या. आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी तिच दर बारा कोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात. तिचे हेल वेगळे होतात. मराठी भाषेतसुद्धा असे वेगळे प्रकार होतात. कोकणातली कोकणी, घाटावरची म्हणजे देशावरची वेगळी, घाटी भाषा वेगळी, वऱ्हाडी भाषा वेगळी मध्यप्रांतांतली, मध्यप्रदेशातही हिंदी मिश्रित आणि गोव्याकडील कोकणी वेगळी असते.
      मराठी भाषा लवचिक आहे थोड्या थोड्या फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला राजभाषेचा मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे.
खेड्यापाड्यातली रांगडी आणि अशुद्ध, अपभ्रंश असलेली भाषा असते. कशीही असो ति मराठीच म्हणून मराठी माणसाला आवडते.
      आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. पण अलिकडे आपल्या तरुण मंडळीला इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण! त्यात त्यांचा दोष नाही. कारण त्यांचं महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं. पदव्या मिळवून तरुन मंडळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. तिथे इंग्रजी भाषाच बोलावी, लिहावी लागते. साहजिकच त्या भाषेचे संस्कार घडत असतात. त्या विकसित देशात आपल्या लोकांना द्रव्यप्राप्ती भारतातील लोकांपेक्षा जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांना तिकडेच रहाणे सुखाचे होते. त्यांचे संसार तिथेच होतात. त्यांच्या मुलांन मराठी येत नाही, ती तिथलीच होतात.
       सर्वचजण नाही पण काही तिथेच स्थायिक होतात. त्यामुळे त्या मुलांची ‘मायबोली’ तिकडची होते. हा विषय जरा वेगळा असला तरी मराठी भाषेवर, रहाणीवर, आचार विचारांव्र खूपच फरक होता. त्यांचं शिक्षणही तिकडेच होते. त्यामुळे मराठीचा त्यांना ग्रंथ, माहितीवार्ता नाही. संस्कारही तिथलेच, असे तिकडे राहिल्यामुळे होते. पण भारतात राहणाऱ्या तरुणांना आपल्य भाषेचा अभिमान नाही आणि त्यांना स्वतःच कौतुकही वाटते तेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हा. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलत तरी हरकत नाही, पण काम झाल्यावर परत आपल्या भारतात या.
          महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करुन द्या. परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नका. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता-वाचता आली पाहिजे.आपल्या मराठीतसुद्धा खूप विषयावर लेखन झाले आहे. शास्त्र-विज्ञान, ललित साहित्य खूप आहे. परदेशातून स्वदेशात येण्यासाठी ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणणारे स्वातंत्रसूर्य सावरकरांची आठवण ठेवा. मातृभाषेचा उदो‍उदो करा, महाराष्ट्राचा जयजयकार करा. एक व्हा संघटित व्हा.
                                लेखन~ सुशीला मराठे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close