आगामी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा दोन सत्रात || Schools in two sessions in the coming academic year 2020-21
शिक्षण खात्याचा आदेश : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना
शिक्षण खात्याचा आदेश : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना
कोरोनाचा प्रादुर्भाव दीर्घ काळासाठी राहणार असल्याने सामाजिक अंतर राखूनच शाळा सुरू ठेवण्याची अनिवार्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दोन सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व शाळांना आदेश देण्यात आला असून सकाळी 7.50 ते दुपारी 12.20 आणि 12.10 ते सायंकाळी 5 या दोन वेगवेगळय़ा सत्रात शाळा भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र शाळा केव्हापासून प्रारंभ होणार, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
5 मे रोजी शिक्षण खात्याच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वेळापत्रकाबाबत चर्चा करण्यात आली होती. आता कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या संचालकांनी शाळांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासंबंधी मार्गसूची जारी केली आहे. दोन सत्रामध्ये शाळा भरविण्याकरिता वेळापत्रकात बदल करण्याची सूचना देण्यात आली आहे. शिक्षकांना देखील एका सत्रात काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
ज्या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि तेथे पटसंख्या कमी असेल तर तेथे दोन सत्रात शाळा भरविण्याची आवश्यकता नाही. मात्र पहिली ते सातवी/आठवीपर्यंत वर्ग असणाऱया शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरवावी लागणार आहे. आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये वर्गखोल्यांची कमतरता असल्यास तेथे देखील दोन सत्रात शाळा भरवावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
शिक्षकांची कमतरता भासत असेल तर स्थानिक परिसरातील अतिथी शिक्षकांची नेमणूक करावी. सामाजिक अंतर राखण्याकरिता पदवीपूर्व महाविद्यालयांच्या वर्गखोल्या, बंद पडलेल्या शाळांमधील खोल्या, समुदाय भवन, दुपारनंतर अंगणवाडय़ांच्या खोल्यांचाही वापरही करता येईल. खासगी विनाअनुदानित शाळांच्या व्यवस्थापन मंडळांनी सामाजिक अंतर राखण्याची आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी घ्यावी. विद्यार्थ्यांची ने-आण करताना सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना शिक्षण खात्याने दिली आहे.
🔶मास्कची सक्ती
दररोज प्रार्थनेच्या वेळी मुख्याद्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांनी मास्क परिधान केल्याची खातरजमा करून घ्यावी. भोजनापूर्वी आणि नंतर, स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबनाचा/हॅन्डवॉशचा वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी. भोजनाला बसताना सामाजिक अंतर राखण्याचीही सक्ती करण्यात आली आहे.
🔶आठवडय़ात 36 तासिका
प्रत्येक आठवडय़ात गणित, विज्ञान, समाज आणि प्रथम भाषा विषयांच्या प्रत्येकी 6 तासिका घ्याव्यात. द्वितीय व तृतीय भाषा विषयांच्या प्रत्येकी 5 तासिका, शारीरिक शिक्षण 4 तसेच चित्रकला/संगीत/कार्यानुभवच्या 3 तासिका, वाचन/संगणक शिक्षण 2 आणि पाठय़पुरक उपक्रमांसाठी 2 याप्रमाणे एकूण 45 तासिका घेतल्या जातात. त्यापैकी शारीरिक शिक्षणाच्या 3 तासिका, चित्रकला/संगीत/कार्यानुभवच्या 3 तासिका, पाठय़पुरक उपक्रमांमधील 2 आणि वाचन/संगणक विषयाची एक तासिका कपात करून आठवडय़ातून 36 तासिका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात वेगवेगळय़ा खेडय़ांमधून विद्यार्थी येत असल्याने सकाळच्या सत्रात त्यांना नाश्त्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळापत्रकासंबंधी स्थानिक परिस्थितीनुरुप जिल्हा प्रशासन वा जिल्हा पंचायतींना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
If you have any doubts, please let be know.