आपली मुले मराठी शाळेत घालायची की इंग्रजी शाळेत ? Want to send your children to Marathi school or English school?
"सध्या मराठी शाळा बंद पडणार" ही बातमी सर्व
ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत आहे. आता यासाठी जबाबदार कोण आहे?
"अनेक वर्षापासून "आपली मुले मराठी शाळेत घालायची की इंग्रजी शाळेत" हा पालकांसमोर पडलेला मोठा प्रश्न आहे !
आपल्या पाल्याला मराठीत शाळेत घालावं का? - ह्या प्रश्नाचं उत्तर सापडण्याआधी - बहुतांश लोक पाल्यांना इंग्रजी शाळेत का घालतात? - ह्या प्रश्नाचा व्यावहारिक विचार करावा लागतो. आणि त्याचं उत्तर सापडण्यासाठी "मुळात शाळेत का जावं?" ह्याचा विचार करावा लागतो.
मी लहान असताना "शाळा" म्हणजे सरकार
मान्य मराठी पाठशाळा असं सरळसोट समीकरण होतं. मी पंधरा वर्षांचा होई पर्यंत
अधूनमधुन कुणीतरी "कॉन्व्हेंट" वाला चकाचक मुलगा दिसायचा. पण "हे
काहीतरी वेगळं असतं" इतकाच भाव यायचा त्याच्याकडे बघून.
आता मराठी शाळेत जाणारं पोर म्हणजे "पालकांना
इंग्रजी शाळा अजिबात परवडू शकत नाही म्हणूनच!" - असं चित्र आहे. आमच्याकडे
शेजारी राहणाऱ्या ताई - ज्यांचा नवरा रिक्षा चालवतो - आपल्या दोन्ही मुलांना
जाणीवपूर्वक इंग्लिश मिडीयम मधून शिकवत आहेत. त्यावरून ह्या
परिवर्तनाची व्याप्ती लक्षात येते.
हे
उगाच घडलेलं, वरवर निर्माण झालेल्या "गैरसमजांपोटी" झालेलं
परिवर्तन नाही.
आपण शाळेत जातो - कारण आपल्याला जगाबद्दल खूप
काही शिकायचं, जाणून घ्यायचं असतं आणि त्याबळावर आपलं भविष्य घडवायचं
असतं... हे शिकण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण घरी-नातेवाईकांत मिळणं अशक्य असतं. म्हणून
एक व्यवस्था उभी रहाते, ज्यात मूल "घडवणं" हेच काम केलं जातं.
बालवाडी - नर्सरी पासून जे जे आवश्यक
असेल ते ते करायलाच हवं - असा दृष्टिकोन पालकांनी बाळगणं चूक नाही. हाच दृष्टिकोन
स्वाभाविक आणि व्यवहार्य आहे. असंच सर्व पालकांना वाटतं.
मग हे असं शिकलेले पोरं "भारतीय"
नसतात, "मातृभाषेतून" शिकलेले नसल्याने फक्त
"पोपटपंची" करतात, त्यांची मातृभाषा निकृष्ट बनते आणि त्यामुळे ते
"संस्कृतीपासूनच" दुरावतात. आणि फक्त प्रॅक्टिकली विचार करतात आणि एखादी
गोष्ट व्यवस्थित नाही झाली की यांची मानसिकता बिघडते.
मुलांनी इंग्लिश मिडीयमच्या शाळेमध्ये
शिकावं गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी असे
पालकांना वाटते. म्हणून तर पालकांनी मराठी शाळा "सोडणं" सुरू केलं ते
ह्या कारणापोटी.
बदलत्या काळानुसार पालकांच्या शाळेकडून असणाऱ्या
अपेक्षा झपाट्याने बदलत गेल्या. मराठी शाळा तितक्या वेगाने स्वतःला आधुनिक करू
शकल्या नाहीत - म्हणून पालकांनी कालानुरूप असणाऱ्या शाळा निवडायला सुरूवात केली.
माझ्या लहानपणी मला जसे शिक्षक होते, तसे शिक्षक आज मराठी
शाळांमध्ये खरंच दिसतात
का ? अस्खलित इंग्लिश जाऊ देत, पण जगभरात होत असलेले
शिक्षण क्षेत्रातील नवनवे प्रयोग अजूनही मराठी शाळांमध्ये पोहोचलेले नाहीत.
त्यातून मिळालेले "धडे" शाळा शिकल्या नाहीत.
३-४ वर्षांचं मूल घरी मोबाईल-लॅपटॉप हाताळत असताना, शाळेत मात्र जुनाच अभ्यासक्रम शिकत असेल तर पुढील १५ वर्षांत तो काय शिकणार
आणि किती "पुढे" येणार हा प्रश्नच आहे.
इंग्रजी अस्खलित असणं ही गरज आहेच - पण ती अनेक
गरजांपैकी एक आहे. मराठी शाळांनी ह्या गरजा भागवल्या तर पालक मराठी शाळा कधीही
प्राधान्यानेच निवडतील!
मला माझ्या मुलाने सायन्स-मॅथ्स-इंग्लिश अत्यंत चांगल्या प्रकारे शिकायला हवं आहे. जोडीने
एक्स्ट्रा करिक्युलर प्रयोग करायला हवे आहेत.
त्याच्या आजूबाजूची मुलं देखील ह्याच "जजब्याची" असावीत. त्या
मुलांचे पालकदेखील असा विचार करणारे असावेत. असेच प्रत्येक पालकांना वाटते.
माझ्या ह्या अपेक्षा जी शाळा पूर्ण करेल - तिथे
मी माझ्या मुलाला टाकणार. सध्या हे इंग्लिश मीडियममध्येच होत आहे - म्हणून तिकडे
ओढा आहे.
त्यामुळे आज जेव्हा मराठी शाळा की इंग्रजी - ही
चर्चा होते तेव्हा "माध्यम" वर असलेला फोकस अगदीच चुकीचा असतो. फोकस
"शिक्षणाच्या दर्जाचं व्हिजन" हा असायला हवा.
मीसुद्धा मराठी माध्यमांत शिकलो. पण मला
इंग्लिशचे शिक्षक अत्युत्कृष्ट लाभले.
थोडक्यात - माझ्या मराठी मीडियमचा "इंग्रजी अस्खलित असण्यात"
अडथळा आला नाही.
पण ... माझ्या HSC च्या
सवंगड्यांइतकं ग्लोबल व्हिजन माझं नव्हतं - हे कटू सत्य कसं नाकारू?
इंग्रजी शाळांमुळे बऱ्याच नव्या समस्या निर्माण होत आहेत. मुलांसाठी, पालकांसाठी, समाजासाठी - सर्वांसाठीच. यासाठी तर मराठी शाळांना "आधुनिक" करायला हवं. दर्जा फार फार सुधारायला हवा.
ते एकदा साध्य झालं की पालक मराठी शाळांवर तुटून पडतील – हे मात्र नक्कीच....
If you have any doubts, please let be know.